महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात दुष्काळाचा कहर; जिल्ह्यातील धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक - 13 percentage

नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे ही कोरडी ठाक पडली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे, तसेच पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्याच्या शोधत नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे.

नाशकात दुष्काळाचा कहर; जिल्ह्यातील धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By

Published : May 15, 2019, 4:24 PM IST

नाशिक- जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा फटका शेतकऱयांना मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील 968 वाड्या-वस्ती आणि गावांना 286 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील धरणात केवळ 13 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाऊस लवकर यावा, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

नाशकात दुष्काळाचा कहर; जिल्ह्यातील धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 968 गावे आणि वाड्यांना 286 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची भीषणता लक्षात घेता दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढतच आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे ही कोरडी ठाक पडली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे, तसेच पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्याच्या शोधत नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे.

पालखेड धरणाच्या अवर्तनावर अवलंबून असलेल्या मनमाड शहरात एक महिन्यांनी पाणीपुरवठा होत आहे. नाशिक जिल्ह्यात एवढी पाणी टंचाई असताना गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडले जात आहे. पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे. चारा, पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत आहे. चारा छावणीची मागणी करूनसुद्धा सरकार याला गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे.

पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शासनाने नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यापैकी 9 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे, मात्र तरी निवारणासाठी येथे अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल, सुरगाणा या भागातील आदिवासी पाड्यावर तर पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असून पाण्याच्या एका थेंबासाठी महिलांचा कोरड्या विहिरीत उतरण्याचा जीवघेणा खेळ सुरू आहे.

जिल्ह्यात एकूण सात मोठे प्रकल्प असून 17 मध्यम प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पाच्या सध्या स्थितीला 9 हजार 888 दशलक्ष घनफुट म्हणजे अवघ्या 13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात 25 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अजून मे महिना संपला नाही, जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एक नजर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यांवर

  • गंगापूर धरण 27 टक्के
  • दारणा धरणं 14 टक्के
  • करंजवण 17 टक्के
  • मुकणे धरण 4 टक्के
  • कडवा धरण 1टक्के
  • चणकापूर धरण 19 टक्के
  • गिरणा धरण 14 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details