नाशिक: सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शेतकरी सुभाष अहिरे यांनी सटाणा बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला होता. व्यापाऱ्याने किलोला अवघ्या सव्वा रुपयाची बोली लावून कांदा खरेदी केला. त्यापोटी आहिरे यांना 569 रुपये 85 पैसे हिशोब पट्टी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना खिशातून वाहतूक भाडे द्यावे लागले.
एवढा आला खर्च: मी माझ्या पाच गुंठे शेतात कांदा लावला होता. त्यासाठी मला जवळपास आठ हजार रुपये खर्च आला. यातून पाच क्विंटल, दहा किलो कांद्याचे उत्पन्न निघाले. 900 रुपये खर्च करून कांदा बाजार समितीमध्ये घेऊन आलो. असा एकूण 8 हजार 900 रुपये खर्च आला. कांदा विक्री करून मला 569 रुपये 85 पैसे मिळाले. माझा जवळपास 8 हजार 330 रुपये 15 पैशाचा तोटा झाल्याचे शेतकरी सुभाष अहिरे यांनी सांगितले.
सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही:नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आहे. एकीकडे व्यापारी कांद्याला मागणी नसल्याचे सांगतात. मात्र आजही किरकोळ बाजारात 12 ते 15 रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री होत आहे. हजार रुपये खर्च करून कष्ट करून शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. शेतकऱ्यांना तोटा सहन करून व्यवहार पूर्णच करावा लागत आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक सत्तेसाठी लढाई करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ही शोकांतिका आहे, असे शेतकरी सुभाष आहिरे यांनी सांगितले.