नाशिक- तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अधिक स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. यापुढील काळात विज्ञानाचा आधार घेऊन कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन आपले घर चालविण्याची गरज आहे. त्यासाठी साचेबद्ध शिक्षणाला आता कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच या कार्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा -राज्यभर हुडहुडी! निफाड @ 2.4 अंशावर, नंदुरबारमध्येही पारा घसरला
यावेळी शरद पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे बीजे रोवली. त्यामुळे समाजातील गोरगरीब शिक्षित झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मुली शिक्षित झाल्यामुळे समाजात सुधारणा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक यांनी शिक्षणाचे रोपटे लावले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. हे शैक्षणिक जाळे निर्माण होण्यात महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार असल्याचे त्यांनी सांगितले. हा जिल्हा जसा अनेक दृष्टीने पुढे जातो आहे. तसेच शिक्षणातही हा जिल्हा आपले नावलौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही. नाशिक जिल्हा कृषीवर आधारित जिल्हा असून द्राक्ष, डाळिंब यासह अनेक पिके आज सुधारित पद्धतीने घेतल्याने उत्पादन वाढले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -नाशिकचे नाव उंचावणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरला स्विफ्ट कारची भेट
या सर्वांमागे कर्मवीरांचे विचार आहे. ते यापुढील काळातही रुजवण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने काम करावे आणि यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी देखील लक्ष घालून विद्यार्थ्यांशी शिक्षणातील गोडी अधिक वृद्धिंगत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तत्कालीन समाजसेवकांनी शिक्षणाची जबाबदारी घेतल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षित झाले. स्वातंत्र्यपूर्वकाळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे समाजसुधारक आपली दैवत असून त्यांची पूजा करावी, असे आवाहन त्यांनी केले. याचे बीज शालेय स्तरावरून रुजवावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच गेल्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
राजकारण्यांनी टीका करण्यापेक्षा तीळगूळ घ्या व जनतेची कामे करा -
राजकारण्यांनी कुठलीही टीका करून वाद करण्यापेक्षा संक्रांतीनिमित्त तीळगूळ घ्या गोड गोड बोला आणि जनतेची कामे करा, असे मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम पवारसाहेब करतात. त्यामुळे पवारसाहेब हेच जाणता राजा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पालखेड डावा कालवा येथील काँक्रीटकरण तसेच नाशिक येवला रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायक दादा पाटील, आमदार हेमंत टकले, डॉ.अनिल पाटील, अॅड. भगीरथ शिंदे, विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, रामशेठ ठाकूर, सुनील मालपाणी, नारायणी गुरुजी, बाळकिसन मालपाणी, डॉ. भाऊसाहेब कराळे, माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, चांगदेव होळकर, अंबादास बनकर, आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, किशोर दराडे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, लासलगाव बाजार समितीचे माजी अध्यक्ष जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, जगदीश जेऊघाले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक , विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.