नाशिक Nashik School News :महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवण्याची संकल्पना सर्वप्रथम जुलै 2023 मध्ये मांडली होती. त्यानंतर महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये दप्तराविना शाळा भरायला सुरुवात झाली. आता हाच प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा' अभियानांतर्गत नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील 13 हजार 26 शाळांमध्ये आता दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्याचं उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे.
दर शनिवारी दप्तराविना भरवण्यात येणार शाळा :डॉ, बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर -शाळा अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. आता दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवण्यात येणार आहे. नाशिक विभागातील एकूण 13 हजार 26 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 26 लाख विद्यार्थी सहभागी होतील. नाशिक जिल्ह्यातील 13 लाख 3694 विद्यार्थ्यांचा यात सहभाग असेल. राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्शशाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी- शाळा, सुंदर -शाळा अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2024 आणि माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आता दर शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असं नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी. बी. चव्हाण यांनी सांगितलं आहे.
राज्यभरात उपक्रम राबवणार :नाशिक मनपा शिक्षण मंडळाची दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवण्याची संकल्पना आहे. महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांनी सर्वप्रथम नाशिक शहरात जुलै 2023 मध्ये ही संकल्पना मांडली. त्यानंतर महापालिकेच्या सर्व 100 शाळांमध्ये विना दप्तर शाळा भरायला सुरुवात झाली. हाच प्रथमदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या दर शनिवारी दप्तरला सुट्टी मिळाल्यानं मुलांमध्ये आनंद वाढतच गेला. अनेक ठिकाणी सकाळी मुलांना शिक्षकांकडून वेगवेगळ्या शालेय खेळ, कथा सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर शनिवारी दप्तरापासून मुक्ती मिळणार आहे.