नाशिक - महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी देवीचा नवरात्रौत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडावर पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
कोरोनामुळे यापूर्वी देवीचा चैत्रोत्सवदेखील रद्द करण्यात आला होता. नवरात्रौत्सव एक आठवड्यावर येऊन ठेपल्याने या संदर्भात काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज सप्तशृंग गडावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विश्वस्तचे पदाधिकारी व विश्वस्त, ग्रामस्थ आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांची एकत्रित बैठक पार पडली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव रद्द करण्यात आला असून नवरात्रौत्सव काळात गडावर कावड घेऊन येणाऱ्या भाविकांनाही बंदी घालण्यात आली आहे.