नाशिक- शहरात सोन्याची चैन आणि मोबाईल ओरबाडून नेणाऱ्या टोळीला पकडण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील तिघा संशयितांना अटक केली असून एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. तसेच संशयितांकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या एका सराफा व्यावसायिकालाही पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे 298 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याची बाजारातील अंदाजी किंमत 9 लाख रुपये एवढी आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळ हॉटेल कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून तिघांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावल्याची घटना बुधवारी 15 तारखेला रात्री घडली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तपास केला असता त्यांना अल्पवयीन संशययितांबद्वल माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून संशयितांना अटक केली. त्यांनीही शहरात 18 चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. त्यातील 11 चेन स्नॅचिंग 2018 साली इतर 7 गुन्हे यावर्षी केल्याची कबुली त्यांनी दिली तसेच त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने शहरातील एका सराफ व्यावसायिकास दिल्याची कबुली दिली आहे.