नाशिक - महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील पाच खासगी लॅबवर बंदी घातली आहे. कोरोना काळामध्ये चुकीचे अहवाल देणे, रुग्णांचे चुकीचे पत्ते छापणे, यामुळे शहरातील पाच नामांकित लॅबला महापालिकेने दणका दिला आहे. तसेच अशा पद्धतीने आणखी काही लॅबदेखील महापालिकेच्या रडारवर आहेत.
कोरोना काळात सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी लॅब चालकांनाही कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या चाचणीनंतर जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या नातेवाईकांना क्वारंटाइन करणे यासाठी या रुग्णांचा संपूर्ण अहवाल, त्यांचा पत्ता, महापालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक लॅब चालकांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला. त्यांच्यामार्फत रुग्णांचे चुकीचे पत्ते टाकणे, अर्धवट माहिती भरणे असे प्रकार सुरू होते. सुरूवातीला महापालिका प्रशासनाने या लॅब चालकांना समज दिली. मात्र, नंतर त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने सोमवारी शहरातील पाच नामांकित लॅब बंद करण्यात आले आहेत.