नाशिक -भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत. त्यांनी भाजपा या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते. असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते. त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो, असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल. त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.