नाशिक Nashik MD Drug Case : नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांनी आणि नाशिक पोलिसांनी (Nashik Police) वेगवेगळ्या कारवाई करत शिंदे गावात टाकलेल्या छाप्यात मेफेडील (एमडी) ड्रग्ज या अमली पदार्थ (MD Drug Case In Shinde Village) निर्मितीचा कारखाना उध्वस्त करीत 300 कोटींहून अधिकचा साठा जप्त केल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. यात पोलिसांनी काही संशयित आरोपींना अटक केली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या या अवैध धंद्याचा संबंध थेट मुंबईच्या अंडरवर्ल्डशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण : नाशिकच्या शिंदे परिसरात रासायनिक कंपनीच्या नावाखाली मेफेडील (एमडी) ड्रग्ज हा अमली पदार्थ (Drug) बनवण्याचा गोरख धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. मुंबई पोलिसांनी याभागात धडक कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त करत करोडो रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. दोन दिवसानंतर याच भागात नाशिक पोलिसांनी देखील कारवाई करत एमडी ड्रग्जसाठी लागणारा करोडो रुपयांचा कच्चा माल ताब्यात घेतला. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात काही सत्ताधारी आमदार देखील सहभागी आहेत. येत्या अधिवेशनात आमच्याकडचे पुरावे आम्ही सादर करू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं. यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी तुमच्याकडे पुरावाही असतील तर लगेच सादर करा, अधिवेशनाची वाट बघू नका, असं नाना पटोले यांना उद्देशून म्हटलं आहे. एकूणच नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय.
ड्रग्जचे मुंबई कनेक्शन? : नाशिकमध्ये करोडो रुपयांचे एमडी ड्रग्ज मिळून आले असले तरी यांचे कनेक्शन मुंबईच्या अंडरवर्ल्डशी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे रॅकेट मुंबई, बंगळुरू इथून चालवत असून, या रॅकेटमध्ये काही स्थानिक गुन्हेगार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाईगिरी, हप्ते वसुली करताना पोलिसांनी पकडण्याची भीती असते. कमी पैशासाठी मोठा धोका पत्करून काम करावे लागते. त्यामुळे झटपट पैसे मिळवण्यासाठी असे भाईगिरी करणारे गुंड एमडी ड्रग्जच्या तस्करीत उतरले आहेत, असे सांगण्यात येत आहे.