नाशिक- महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली. धरण्याच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. परिणामी शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
हा विसर्ग गोदावरी नदीत सुरू असल्यामुळे नदीची पाणी पातळी काही प्रमाणत वाढली आहे. प्रशासनाच्या वतीने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दारणा धरणातून देखील 5924 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग केलेले पाणी जायकवाडी धरणात जाणार असून ह्यामुळे मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा - मालेगावात मुसळधार : नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात
प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा -
- नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी-नाले ओढ्यांमध्ये प्रवेश करू नये
- पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये
- विद्युत खांबापासून दूर राहावे
- जनावरांना नदीपात्रांपासून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे
- वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये
- कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये
- धोकादायक क्षेत्रात सेल्फी काढू नये
- पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा - नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी द्वारका परिसरात अत्याधुनिक पोलीस चौकी