नाशिक Nashik Drug Case :मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिकमधील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केल्यानंतर नाशिक पोलीसदेखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतंय. नाशिक पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आलं. तसंच शहरातील 9 कॉफी शॉपमध्ये युवक-युवती अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं समोर येताच हे कॉफी शॉप सील करण्यात आले.
काही प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करणारे घरात बसून आहेत. मात्र, दुसरीकडे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्दी खोकल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यानुसार केमिस्टकडे खोकल्याच्या औषधांचा खपही वाढला आहे. हा खप वाढण्यामागचे कारण केवळ सर्दी खोकला नसून याचा औषध म्हणून कमी तर नशेसाठी अधिक वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं विविध प्रकारच्या खोकल्याच्या औषधांचा लाखोंचा साठा जप्त केला. उच्चभ्रू तरुणांमध्ये खोकल्याच्या औषधाची मागणी वाढली असून पार्टीमध्ये याचा सर्रास वापर होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. शहर व परिसरातील औषध विक्रेत्यांवरदेखील पोलिसांचं लक्ष राहणार आहे.
नशेची किक बसते :नाशिकच्या स्थानिक पोलीस तसंच अमली पदार्थ विरोधी पथकांनं ड्रग्स पुरवण्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्यानं सहज ड्रग्ज मिळणं कठीण झालंय. त्यामुळं नशेबाज तरुण, तरूणींनी प्रतिबंधित औषधाचा डोस घेण्याकडे मोर्चा वळवलाय. केमिस्टकडे खोकल्याचं औषध हे प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्वाधिक विक्री होणारं औषध आहे. गेल्या वर्षीपेक्षा काही दिवसात या औषधांच्या मागणीत दुपटीनं वाढ झाली आहे. छोट्या पार्ट्यांमध्ये याचा नशेसाठी वापर केला जातोय. 13 ते 15 वर्षाचे अल्पवयीन मुलं नशेसाठी 200 ml ची औषधाची बाटली घेतात. ही औषधं तात्काळ परिणाम करत त्यांना अपेक्षित असलेली किक देतात. कोणत्याही ड्रग्ज सौम्य डोसप्रमाणे या औषधामुळं शरीराला उत्तेजना मिळते, त्यानंतर धुंदी येते. औषधाच्या सेवनानंतर मेंदूची विचारशक्ती काही वेळासाठी मंदावते. मेंदुवरील नियंत्रण हरवल्याचा भास होतो.