नाशिक : राज्यासह नाशिक शहरामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहे. सोशल मीडियावरील तरुणी, महिला आणि मुलांच्या ब्लॅकमेल प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबरदूत ही संकल्पना महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. समाजात घडणाऱ्या अनुचित प्रकाराला 'सायबरदूत' या उपक्रमामुळे नक्की आळा बसेल, असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटना :सध्या सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच ऑनलाइन पध्दतीचा वापर करून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशात काही शिक्षित नागरिक वगळता अनेकांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याबाबत अज्ञान आहे. त्यामुळे असे नागरिक सोशल मीडियाच्या गुन्हेगारीला बळी पडत आहे. यासाठी नाशिक पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्यासाठी 1 हजार सायबरदूतांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कॅप्सूल कोर्सद्वारे प्रशिक्षण देणार :प्रशिक्षीत सायबरदूतांना सायबर पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि 'सायबरदूत' बॅच देण्यात येत आहे. हे सायबरदूत शहरातील शाळा, महाविद्यालय, कंपनी, संस्था, रहिवासी परिसर या ठिकाणी सायबर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार आहे. त्यात मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन साधनांच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करणार आहे. प्रशिक्षित झालेल्या सायबरदूतांना भविष्यात कॅप्सूल कोर्सद्वारे तज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. सोशल मीडिया माध्यमाचा वापर, वाढते शहरीकरण तसेच पाश्चात्त्य संस्कृतीने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हा सायबरदूत उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास आणि संरक्षणाची भावना अधिक बळकट करण्यास उपयुक्त ठरेल, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.