नाशिक Nashik Crime :आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊनदिंडोरी इथल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाच्या विश्वस्ताकडून एक कोटी उकळणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेसह तिच्या मुलाला अटक करण्यात आली होती. या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सारिका सोनवणे असं त्या खंडणीखोर कृषी सहाय्यक महिलेचं नाव आहे. तर मोहित सोनवणे असं तिच्या मुलाचं नाव आहे. या दोघांनी दिंडोरी इथल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त निंबा शिरसाट यांच्याकडून वेगवेगळे कारण देत आतापर्यंत एक कोटी पाच लाख रुपये लुटले आहेत. सारिका सोनवणेनं बलात्काराचा गुन्हा दाखल करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर याप्रकरणी शिरसाट यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
काय काय आहे प्रकरण :सारिका आणि शिरसाट यांची 2014 मध्ये ओळख झाली, दोघंही देवळा तालुक्यातीलच रहिवासी आहेत. संबंधित महिलेनं आजारपण, शेती, मुलाचं शिक्षण अशी कारणं सांगून 2019 मध्ये प्रथम शिरसाट यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. जानेवारी 2023 मध्ये महिलेनं शिरसाट यांना भेटून मोबाईलमधील काही व्हिडिओ दाखवले अन् पुन्हा 20 कोटी रुपयांची मागणी करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीला घाबरुन शिरसाट यांनी 50 लाख रुपये दिले, मात्र त्यानंतरही तिनं 10 कोटींची मागणी केली असता निंबा शिरसाठ यांनी पोलिसांकडे धाव घेतली.