नाशिकNana Patole On Nashik Drug Case:साकीनाका पोलिसांनी शिंदे गावात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात मेफेडील (एमडी) या अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त करीत 300 कोटींचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर नाशिक पोलीस सतर्क झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी शिंदे येथे एका बंद पडलेल्या गोदामावर छापा टाकून आणखी सहा कोटीचा एमडीचा साठा व रसायन जप्त केला. करोडो रुपयांचे एमडी ड्रग्ज मिळून आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या एमडी ड्रग्ज माफियांबद्दल आम्हाला देखील माहिती मिळाली आहे. यात काही आमदार देखील सहभागी आहेत. येत्या अधिवेशनात आमच्याकडचे पुरावे आम्ही सादर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. तसेच आज पासून नाशिक बचाव ही मोहीम काँग्रेस राबवणार आहे. ड्रग्ज माफियांकडून नाशिक मधील काही शाळेत ड्रग्ज दिले जात आहेत असा गंभीर आरोप देखील पटोले यांनी केला आहे.
पोलीस तपासणी मोहीम राबवणार:शिंदे गावात करोडो रुपयांचे एमडी ड्रग्स मिळून आल्यानंतर नाशिक पोलिसांकडून शिंदे व पळसे औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या सर्व गोदाम, कंपन्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं. नाशिक रोड, जेलरोड, मालधक्का रोड, देवळाली गाव, सिन्नर फाटा, सुभाष रोड परिसरात खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र, स्थानिक पोलिसांकडून त्याकडे कानाडोळा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह तरुणांना खुलेआम एमडी ड्रग्ज मिळू लागल्याने ते व्यसनाच्या आहारी केले आहेत. त्यातच मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नाशकात तळ ठोकून शिंदे येथील एमडीचा कारखाना उध्वस्त केला. यामुळे नाशिक पोलिसांची निष्क्रियता उघडकीस आली आहे. मात्र, या प्रकरणा नंतर का होईना नाशिक पोलिसांनी शिंदे येथील औद्योगिक वसाहतीत जनजागृती मोहीम राबवण्यास सुरू केली आहे.