नाशिक- शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू असताना, कारवाईच्या भीतीने पळ काढणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसानी काठी फेकून मारल्याने शुभम महाले हा युवक गंभीर जखमी झालाआहे. पोलीस आमची तक्रार दाखल करून घेत नसल्याचे शुभमच्या आईने सांगितले.
नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबवली. या दरम्यान हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई करत लाखों रुपयांचा दंड वसूल केला, मात्र हीच कारवाई एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. नाशिकरोड भागात राहणारा शुभम महाले आणि त्याचा भाऊ ओमकार महाले हे संगमनेरहून दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने येत होते. यावेळी सिन्नर फाटा भागात पोलिसांकडून हेल्मेट सक्ती मोहीम सुरू होती. हेल्मेट नसल्याने आपल्यावर करवाई होईल या भीतीने ओमकार महाले याने गाडी वळवून पळण्याचा प्रयत्न केला. अशात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकून मारली. ही काठी गाडीवर मागे बसलेल्या शुभमच्या डोक्यात लागली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.