नाशिक :कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने बहुतांश कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र दुसरीकडे गणेशोत्सवासाठी ढोल पथकाला परवानगी दिली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवात ढोल पथकाचा आवाज गुंजणार नाही. एकीकडे सर्वच राजकिय कार्यक्रमांना परवानगी मिळत आहे. मात्र ढोल-ताशा पथकाला का नाही? असा सवाल ढोल वादक करत आहेत.
गणेशोत्सव म्हटलं की नाशिक ढोलची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नाशिकचे ढोल पथक भारतात नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रत्येक सण उत्सवात खास करून गणेशोत्सवात नाशिकच्या ढोल पथकाला विशेष मागणी असते. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत नाशिक ढोलच्या तालावर भाविक थिरकतात. नाशिक जिल्ह्यातील 45 ढोल पथक आहेत. प्रत्येक पथकात साधारण 50 पेक्षा अधिक वादक आहेत. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वादकांच्या हाताला काम नाही.
राजकिय रॅलींना परवानगी, मग ढोल पथकाला का नाही?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने बहुतांशी निर्बंध शिथिल केले आहेत. दुकाने, मॉलसह सर्वच बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. लग्न समारंभासाठी दोनशे लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच राजकीय रॅली, आंदोलने सुरू आहेत. पण, गणेशोत्सव काळात ढोल पथकाला परवानगी नाही. त्यामुळे यंदा सार्वजनिक आनंद साजरा करण्यावर निर्बंध असल्याने भाविकांचा मात्र हिरमोड होणार आहे. त्यामुळे राजकिय रॅलीला परवानगी, मग ढोल पथकाला का नाही? असा सवाल रूद्र ढोल पथकाचे संचालक अनिरुध्द यांनी उपस्थित केला आहे.
आर्थिक नुकसान
'आमचं रुद्र ढोल पथक आहे. यात एकूण 300 वादक, 80 ढोल, 80 ताशे आणि झेंडे आहेत. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून साहित्य गोडावूनमध्ये धूळखात पडून आहे. त्यामुळे ढोलवर बुरशी तयार झाल्याने आता पुन्हा वादन सुरू करायच्या वेळी त्याचा मेंटेनन्स करावा लागणार आहे. शासनाने आमचा विचार करून ढोल पथकाला गणेशोत्सवात परवानगी द्यावी. आम्ही सर्व नियमांचे पालन करू', असं अनिरूद्ध यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -कोरोना निर्बंध असल्याने गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी, मात्र इतर राज्यातून मूर्तींना मागणी असल्याने काहीसे समाधान व्यक्त