नाशिक- लोकसभा निवडणुकीत यंदा समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे असा थेट सामना बघायला मिळत आहे. या निवडणुकीत युतीचे खासदार हेमंत गोडसे यांचे पारड जड असले तरी एकाच गोष्टीची चिंता सध्या गोडसेंना सतावत आहे. ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंतच्या इतिहासाची, नेमका काय आहे या मतदार संघाचा इतिहास याबाबतचा विशेष आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने... पाहुयात हा एक विशेष वृत्तांत...
राजकीय विश्र्लेषक संपत देवगिरी हे सांगतात की, नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ६ विधानसभा मतदारसंघानी तयार झालेला आहे ग्रामीण आणि शहरी भागाच्या समावेश असलेला लोकसभेचा हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या विभिन्न आहे. यंदा या मतदारसंघातील सामना हा युती विरुद्ध आघाडी असा असला तरी भुजबळ विरुद्ध गोडसे असा थेट सामना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे गेल्या निवडणुकीत थेट छगन भुजबळ यांना पराभूत करून जायंटकिलर ठरले होते. पाच वर्षात केलेले विकास कामे, दांडगा जनसंपर्क आणि भाजप युतीचे बुथ पातळीवरचे नियोजन या भरोशावर गोडसे पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसत आहेत. मात्र, या सगळ्यात त्यांच्या मनात नाशिकच्या खासदारकीच्या इतिहासाची भीती निर्माण झाली आहे. कारण, १९५२ पासूनल ते २०१४ पर्यंतच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाचा मागोवा घेतला असता हे दिसून येते की, १९७२ चा अपवाद वगळता एकही खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून आला नाही. हा इतिहास पाहता, हेमंत गोडसेंना ही तीच चिंता सतावते की सलग दुसऱ्यांदानाशिकचा गड राखण्यात त्यांना यश मिळणार का? की इतिहासाची पुनरावृत्ती होणार याचीच.
देवगिरी म्हणाले, नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की १९५२ पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये गो. ह. देशपांडे यांच्या सारखे लोकप्रतिनिधी दोनदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र सलग नाही. त्यानंतर कवडे यांनी एकदाच सलग खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला तो १९७२ मध्ये. मात्र, त्यानंतर जवळपास ४७ वर्षांत एकही खासदार सलग दोन वेळा निवडून आलेला नाही.