नाशिक- कोरोना विषाणू संसर्गात राज्यातील डॉक्टर व कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र संचारबंदी असताना मालेगावमध्ये आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल यांच्या समवेत आलेल्या सुमारे २० ते २५ कार्यकर्त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी रात्री आठच्या सुमारास हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खळबळजनक; मालेगावात संचारबंदीत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर आणि परिचारिका जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करत आहेत. मात्र आमदाराचा फोन न उचलल्याने समर्थकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना मालेगावात घडली आहे.
आमदारांसोबतच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी डॉ. डांगे, डॉ. पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यामुळे भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी काम बंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडून होत असलेल्या अन्यायाविषयी संताप व्यक्त केला. हा सर्व प्रकार यावेळी रुग्णालयात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचार्यांदेखत झाला. आ. मौलाना व त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या दहशतीपुढे ते काहीही करू शकले नाही. कोरोनाचे संशयित रुग्ण दाखल असताना तसेच संचारबंदीचा आदेश असताना आमदारांसह इतका मोठा जमाव रुग्णालयात घुसतोच कसा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकारानंतर उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी परिस्थिती हाताळली. रात्री उशिरापर्यत पोलीस कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.