मालेगाव (नाशिक) Malegaon Fire : नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात भीषण आग लागल्याची घटना घडलीय. यात मोठ्या प्रमाणात घरं आणि झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग झपाट्यानं पसरत गेल्यामुळं सुमारे 35 पेक्षा जास्त झोपड्या आणि घरं अगीच्या विळख्यात सापडून खाक झाले आहेत. ही आग तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली असून या आगीमुळं अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. या आगीचं कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आग नेमकी कशी लागली :आग लागलेल्या या परिसरातछोटी वस्ती आणि लाकडांची घरं असल्यानं एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटांत आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी 11 फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचं नुकसान झालंय. तसंच ही आग नेमकी कशामुळं लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.