नाशिक : जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार अजित पवार यांच्या गटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात पुलोद पॅटर्नला भरभरून साथ देणाऱ्या नाशिक जिल्ह्याला साद घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ये नाशकात येत आहेत. शरद पवार हे 8 जुलै रोजी नाशिकच्या पक्ष कार्यालयात बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या विरोधात आघाडी उघडली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पुलोदच्या काळात सगळे मतदार संघ शरद पवारांच्या पाठीशी :अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमादरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांच्यासह आमदार नितीन पवार, दिलीप बनकर हे उपस्थित असल्याने ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सरोज अहिरे आणि माणिक कोकाटे येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. दरम्यान नाशिक जिल्हा व राष्ट्रवादीचे अनेक वर्षांपासून समीकरण आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. पुलोदच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना पाठींबा मिळाला होता. नाशकात आपली ताकद पुन्हा दाखवण्यासाठी शरद पवार आठ जुलैला नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील अजित पवार गटात :नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आमदारांपैकी सर्वच्या सर्व अजित पवार यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. आता संघटनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी देखील तोच मार्ग निवडल्यामुळे एकीकडे ज्या नाशिक जिल्ह्याने शरद पवार यांना भरभरून साथ दिली, तेथे आता त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचे दिसून आले आहे. अजित पवार गटातील भुजबळ समर्थक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, संजय खैरनार, किशोर खैरनार आदी प्रमुख पदाधिकारी देखील अजित पवार गटात दाखल झाले आहेत.