नाशिक - जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये कंटेनमेंट झोन (containment zone) वगळता सर्व उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सातपूर व अंबड येथील उद्योग देखील सुरू होऊ शकतात.
LockDown : निमाच्या पाठपुराव्यास यश.. नाशकातील सातपूर, अंबडमधील उद्योग होणार सुरू! - सातपूर अंबड उद्योग
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये कंटेनमेंट झोन (containment zone) वगळता सर्व उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सातपूर व अंबड येथील उद्योग देखील सुरू होऊ शकतात.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला प्रतिसाद देत उद्योजकांनी उद्योग बंद ठेवले होते. परंतु व्यवसाय चक्र ठप्प झाल्याने अटी शर्तींसह, योग्य ती खबरदारी घेत उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य शासन व जिल्हा प्रशासन अशा विविध स्तरावर निमातर्फे पाठपुरावा करण्यात येऊन नियोजनबद्ध प्रयत्न झाले. संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये न करता मालेगाव तालुका 'हॉटस्पॉट' म्हणून जाहीर व्हावा व नाशिक शहरात तसेच उर्वरित भागातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात यावेत या मुद्द्यावर सातत्याने जोर देत निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, औद्योगिक विकास व धोरण समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योग सुरु करण्याची प्रक्रिया कार्यान्वीत झाली. यातही विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून उद्योजकांना या प्रक्रियेत अडचणी येऊ नये यासाठी निमातर्फे वेळोवेळी मार्गदर्शनपर सूचना जाहीर करण्यात आल्या. यासाठी निमातर्फे हेल्पडेस्क देखील सुरू करण्यात आला आहे.
अखेरीस नाशिक मधील सातपूर व अंबड औद्योगिक वासहतींतील उद्योग सुरू होण्याचा देखील मार्ग मोकळा झाल्याने निमाच्या प्रयत्नांस मोठे यश लाभले असून निमा अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली निमा पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून चालवलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांबाबत नाशिक उद्योगजगतातून प्रशंसा व्यक्त केली जात आहे.
उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी म.औ.वि. महामंडळाच्या पोर्टल permission.midcindia.org वर प्रतिज्ञापत्र अपलोड करावे व शासन व जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.