बिबट्या बंगल्याच्या आवारात फिरत असताना सीसीटीव्हीत कैद नाशिक:गौळाणे येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम पांडुरंग चुंभळे यांच्या बंगल्यांच्या आवारात 13 तारखेला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास बिबट्याचा शिरकाव झाल्याने चुंभळे कुटुंबीयांसह मळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. मध्यरात्री कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्यावर सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर बंगल्याच्या आवारात बिबट्या शिकारीच्या शोधात आलेला दिसला. या भागात पिंजरे लावून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आधीही बिबट्याचा वावर :या भागात बिबट्या मुक्त संचार करत असल्याने यापूर्वी 20 ते 25 वेळेस चुंभळे यांच्या घराच्या आवारात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यावेळी बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला केला होता. पुन्हा आता याच भागात बिबट्या दिसून आला आहे. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याभागात पिंजरा लावला आहे. पण बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. यासंदर्भात वन विभागास माहिती देण्यात आली असून बिबट्याचा माग घेण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे, मात्र बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतमजूर येत नाहीत :या भागात यापूर्वीही बिबट्या आढळून आला होता. वनविभागाने कायमस्वरूपी रात्रीची ग्रस्त वाढवावी व नागरिकांमधील भीती दूर करावी. बिबट्याच्या दहशतीने शेतमजुरांनी शेतात येणे बंद केले आहे. शेतीच्या कामाचे नुकसान होत आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकरी सर्व आंदोलन करतील, असे शेतकरी शांताराम चुंभळे यांनी म्हटले आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी :नाशिक जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.