नाशिक :मानववस्तीत बिबट्याचा वावर अलीकडे वाढला असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या दारणानदी काठच्या पट्ट्यात नानेगाव, शेवगेदारणा, संसरी, भगूर, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी ही गावे वसलेली आहे. या परिसरात बाराही महिने शेती हिरवीगार आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठी जागा मिळत आहे. त्यामुळे रात्री व दिवसाही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी :शनिवारी २९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान वंजारवाडी रस्त्यावर लोहशिंगवे गावालगत गराडी नाल्याजवळ दोन बिबटे दिसून आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या भात लावणी चालू आहे. ग्रामीण भागात लोडशेडींग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री मोटार चालू बंद करावी लागत आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी होत आहे. या परिसरात वनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी, वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.
तरूणावर बिबट्याचा हल्ला :नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ एका १७ वर्षीय तरुणावर शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीवर डोक्यावर बिबट्याने पंजा मारला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. कृष्णा सोमनाथ गीते, असे बिबट्याच्या हल्लात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.