सटाणा (नाशिक)- परराज्यातून गावी आलेल्या मजुरांचे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावपातळीवर गावाबाहेर विलगीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंतापूर येथील या मजुरांना गावाबाहेरील झाडाखाली, डोंगर कपारीत किंवा नदीकाठी राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न-पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले. मात्र ते रेशनकार्ड अभावी खऱ्या वंचितांच्या पोटात न गेल्यामुळे हे कष्टकरी अन्न धान्यापासून वंचित असल्याचे भयावह वास्तव बागलाणमध्ये आहे.
लॉकडाऊनच्या काळात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह राज्याच्या अन्य ठिकाणी शेकडो मजूर अडकले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची घरवापसी सुरू झाली आहे. मात्र, गाव पातळीवर त्यांना गावाबाहेर विलगीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना चौदा दिवस कामावर जाण्यास मज्जाव केला जात असल्यामुळे आज तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मोफत धान्य वाटत आहे. परंतु या कष्टकरी मजुरांकडे रेशन कार्डच नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत.