नाशिक- चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा येथील सायबराबाद पोलिसांनी शहरातील सराफा व्यापाऱ्याला ताब्यात घेतले होते. त्या सराफाचा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विजय बिरारी असे सराफाचे नाव आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत चर्चेला परिसारात उधाण आले होते.
भाजपच्या व्यापारी संघटनेचे राज्य पदाधिकारी असलेले बिरारी यांची पेठरोडवरील शनी चौकात सराफी पेढी आहे. बिरारी यांची हत्या की आत्महत्या याचे गूढ मात्र कायम आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नाशिक सराफ असोसिएशनने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. तेलंगणा पोलिसांनी छळ करून बिरारी यांची हत्या केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम होते.
चोरीच्या गुन्ह्यातील सोने स्वीकारण्याच्या कारणावरून सायबराबाद पोलिसांनी बिरारी यांना सोमवारी सांयकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. तपास पथकात 12 ते 16 पोलिसांचा समावेश आहे. राहण्यासाठी या पथकाने शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 406 घेतली होती. याच ठिकाणी सोमवारी रात्री बिरारी यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मंगळवारी दुपारपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच होता. घटनेनंतर नाशिक पोलिसांनी पथकातील सर्वच पोलिसांना लागलीच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाब रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसून नाशिक पोलिसांचा तपास मात्र सुरू आहे. या प्रकरणी सायबराबाद पोलिसांची चौकशी सुरू असून घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.
हेही वाचा -नाशिकमध्ये 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन, फक्त 25 रुपयांत चिकन बिर्याणी