नाशिक : लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र अखंडितपणे सुरू ठेवण्याचा काही शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर ठेवून ज्ञानदान केले असल्याचे अंबानेर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक गोविंद गिरी यांनी सांगितले. गिरी हे प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन समाज मंदिर, ओसरी, पारावर विद्यार्थ्यांना जमवून त्यांच्यात योग्य ते शारीरिक अंतर ठेवून ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी प्रत्यक्ष कोरोनाशी झुंज देत असताना शिक्षकांनी का मागे राहावे याचा ध्यास घेऊन, या शाळेतील शिक्षक वाडी-वस्तीवर जाऊन काम करत आहेत.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण 'लॉक' होऊ नये म्हणून 'या' शिक्षकाची अशीही धडपड
जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लॉकडाऊन काळातही ज्ञानदान केले जात आहे. दिंडोरी तालुक्यातील अंबानेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक गोविंद गिरी हे प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन समाज मंदिर, ओसरी, पारावर विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवून शाळा भरवत ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांच्यासाठी झूम ॲप, गुगल मीट, याद्वारे दर दिवशी क्लास घेऊन शिकविले जाते. परंतु, परिस्थितीनुसार प्रत्येकाकडे या सुविधा असतीलच असे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईलसारख्या सुविधा नाहीत अशा पालकांच्या पाल्यांना प्रत्यक्ष गावात जाऊन अध्यापनाचे काम या शाळेतील कृतिशील शिक्षक गोविंद विठ्ठल गिरी करत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेच्या झेरॉक्स प्रती वाटून त्यांच्याकडून अध्ययनाचे धडे गिरवून घेत आहेत. आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्यक्ष गावात जाऊन पालकांशी हितगुज करून, पालकांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट करून किमान दोन-तीन तास अध्यापन केले जात आहे.
सध्या लॉकडाऊन काळामध्ये शाळा कधी उघडतील, आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये बसून कधी अभ्यास करू, याची शाश्वती कोणालाच नाही. पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अविरतपणे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत आहेत, ही स्तुत्य बाब आपणास पहावयास मिळते. हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवण्याचा प्रयत्न राहाणार असल्याचे गिरी यांनी सांगितले आहे. त्यांच्या या उपक्रमाला तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक यांचे सहकार्य मिळत आहे.