नाशिक -पत्नीच्या आत्महत्येनंतर चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी जायखेडा पोलीस ठाण्यात घडला आहे. प्रकाश भिमराव निकम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील तो रहिवाशी आहेत.
पांघरायच्या शालने ठाण्यात घेतला गळफास -
प्रकाश निकम यांच्या पत्नी छाया (वय २५) यांनी शुकवारी आपल्या नामपूर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर नामपूर पोलिसांनी प्रकाश निकम (वय ३०) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला जायखेडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पांघरायच्या शालने पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत दाम्पत्यास एक मुलगा एक मुलगी आहे.
सी.आय.डी. पथक घटनास्थळी दाखल -
दरम्यान नामपूर येथे पोलीस व राज्यराखीव दलाच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सी.आय.डी. पथक, ठसे तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहेत.