नाशकात कोरोना बळींची संख्या शंभरी पार, सर्वाधिक 64 मृत्यू मालेगावात
नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मालेगावातही पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढली आहे. तर, नव्या ग्रामीण भागांत रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात 102 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापैकी सर्वाधिक 64 मृत्यू मालेगावात झाले आहेत.
नाशिक - नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही प्रमाणात मालेगावातही पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढली आहे. तर, ग्रामीण भागातील नव्या भागात रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या शंभरी पार गेली असून आतापर्यंत 102 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यात सर्वाधिक 64 मृत्यू मालेगावात झाले आहेत.
जिल्ह्यात आज 43 नव्या रुग्णांची भर पडली. यात एकट्या नाशिक शहरातील 33 रुग्ण आहेत. तर, ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 683 इतका झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 102 जणांचा बळी घेतला आहे. समाधानाची बाब म्हणजे 1 हजार 93 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात प्रामुख्याने दाट वस्ती असलेल्या जुने नाशिक, वडाळा, फुलेनगर या परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरगाव झाल्याने मालेगावप्रमाणे स्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 487 जवळ पोहोचला आहे.
तर, 9 जून च्या रात्री जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालात 18रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात अमरधाम रोड 1, सातपूर कॉलनी 2, पंचवटी 1, फुलेनगर 1, जयदीपनगर 1, पेठरोड 1, नाईकवाडीपुरा 1, आझाद चौक 1, सरदारचौक 2, नागचौक 2, काठेमळा 2 येथील रुग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 488 वर पोहोचला आहे.
ग्रामीण भागातील पिंपळगाव बसंवत 1, येवला 1, इगतपुरी 1 असे रुग्ण आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा 287 झाला आहे. तर, मालेगावचा आकडा 854 वर स्थिर झाला आहे. कोरोनामुळे आज तिघांचा मत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा 102 झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांचा आकडा 1 हजार 93 वर पोहचला आहे.
नाशिक जिल्ह्याची परिस्थिती
-जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 1 हजार 683
-कोरोनामुक्त 1 हजार 93,
-एकूण मृत्यू 102.
-उपचार घेत असलेले रुग्ण 488,
-मालेगावात 87.
-शहरात 296,
-ग्रामीण 89,
-जिल्ह्याबाहेरील रुग्ण 16