महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे महत्त्वाचे मार्ग खचले, गावांचा संपर्क तुटला - Sinnar

तालुक्यातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा रस्ताच अतिवृष्टी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने खचला आहे. काही तासातच हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. रहदारीचा रस्ताच वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

खचलेल्या रस्त्याचे छायाचित्र

By

Published : Aug 6, 2019, 8:11 AM IST

नाशिक- इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील संपर्कच बंद झाला आहे. तालुक्यात अद्यापही पूरस्थिती गंभीर असून नद्यांचे पाणी अनेक पुलांवरुन वाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील निनावी-शेनित रस्ताच पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर सिन्नर अकोले तालुक्याला जोडणाऱ्या टाकेद- म्हैसवळन घाटात रस्ता खचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात दर वर्षी सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद होते. या वर्षी गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३८०० मि.मी पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासात ३६८ मि.मी पाऊस झाला असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे. त्यात अतिवृष्टीने रस्ता खचल्याने तालुका प्रशासनापुढे वाहतुकीची नविन समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील निनावी - भरवीर मार्गावरील रहदारीचा रस्ताच अतिवृष्टी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने खचला. काही तासातच हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रहदारीचा रस्ताच वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आज मात्र वाहतुकीच्या गंभीर समस्येला स्थानिक नागरिकांना समोरे जावे लागत आहे.

त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातील सिन्नर व नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या टाकेद - म्हैसवळन घाटात आज रस्ता खचल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली. याच मार्गावरुन अकोले, ठानगाव, घोटी म्हैसवळन मार्गे सिन्नर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र हा मार्ग खचल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details