नाशिक - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडली. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना तिचे अंत्यदर्शनसुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या कुटुंबीयांच्या भेटीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोनही घटना लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्यावर कुटुंबीयांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असताना पोलिसांनी कुटुंबीयांना डांबून ठेऊन रातोरात अंत्यविधी केला, हा प्रकार तरी काय आहे? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -हाथरस येथील बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करा; मनमाड येथील वंचित बहुजन युवक संघातर्फे निवेदन