नाशिक (मनमाड) - मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्त्या करून फरार झालेल्या 4 आरोपींना लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रोजी शिवम पवार या तरुणांची हत्त्या करण्यात आली होती. प्रेम प्रकरण आणि सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड करण्याच्या प्रकरणातून हत्या करून हे चारही आरोपी फरार झाले होते. तीन दिवस तळ ठोकून असलेल्या पोलीस पथकाने अगदी शिताफीने या चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अखेर त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून अटक
सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो अपलोड करण्याच्या वादातून 6 नोव्हेंबर रोजी ऐन भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकावर चार तरुणांच्या टोळक्याने उसवड तालुका चांदवड येथील शिवम पवार याचा धारदार शस्राने निर्घृण खून करून पलायन केले होते. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून अटक करण्यात आली. चेतन मोधळे, मयुर कराळे, निशांत जमधाडे, मोहित सुकेजा अशी या चार संशयितांची नाव आहेत. त्यांना आज मनमाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लोहमार्ग जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, महेंद्र पाटील, संतोष भालेराव, प्रमोद जाधव, सागर पेठे, आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर प्रेम त्यातून वाद व खुन