नाशिक - नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रमुख अन्न वितरण (फूड डिलिव्हरी) कंपन्यांना अन्न व औषध विभागाने नोटीस बजावल्या आहेत. डिलिव्हरी बॉईजसाठी आवश्यक असलेल्या अन्न व औषध विभागाच्या परवान्याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब समोर आल्याने एफडीएने या नोटीस बजावल्या आहेत.
शहरात अन्न वितरण करणाऱ्या ३ कंपन्या असून शहरातील ५०० हॉटेलसोबत त्यांचे करार आहेत. या कंपन्यांकडे एकुण ३ हजार ५०० कर्मचारी डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत. हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री करण्यासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्रानंतरच डिलिव्हरी बॉय आपले काम सुरु करू शकतात. मात्र, शहरातील बहुतांशी डिलिव्हरी बॉईजकडे अन्न नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे.