नाशिक : नाशिकच्या प्रेसमध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोट प्रेसमध्ये तब्बल 5 हजार 200 दशलक्ष नोटा छापल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाने नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला पाचशे रुपयांच्या नोटा छापण्याचे टार्गेट दिले होते. आतापर्यंत 30 कोटी नोटा छापल्या गेल्या आहेत. आता दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी पाचशे रुपयांच्या चार नोटा लागतील. त्यामुळे पाचशेच्या नोटांची मागणी वाढली असल्याचे प्रेस मजदूर संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.
500 पर्यंतच्या नोटा छापण्याचे काम : 2018 मध्ये मोदी सरकारने पाचशे, एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद करून दोन हजारांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नाशिक रोड प्रेसला दोन हजार रुपयांच्या नोटा छपाईचे काम मिळाले होते. तेव्हा कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करून निर्धारित चलन छापून दिले होते. आता पुन्हा नाशिकरोड प्रेसला नोट छपाईचे काम मिळाले आहे. आता पाच रुपयांपासून ते 500 पर्यंतच्या नोटा छापण्याचे काम देण्यात आले आहे. हे काम अब्जावधींचे आहे. त्यामुळे प्रेस कामगारांच्या कामाचे तास वाढणार असून 24 तास काम सुरू रहाणार आहे.