नाशिक -येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी चार हजारांचा टप्पा पार केला आहे. अशातच नाशिक ग्रामीण पोलीस दलासोबत आता शहर पोलिसांमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून बुधवारी मुंबई येथे रुग्णालयात दाखल असलेल्या नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने बळी घेतला. शहर पोलीस आयुक्तालयातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला असून संपूर्ण आयुक्तालयावर शोककळा पसरली आहे. याआधी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
धक्कादायक; नाशिक शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी... - नाशिक कोरोना रुग्णसंख्या बातमी
बुधवारी मुंबई येथे रुग्णालयात दाखल असलेल्या नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने बळी घेतला. शहर पोलीस आयुक्तालयातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला असून संपूर्ण आयुक्तालयावर शोककळा पसरली आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते. मात्र, फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी शहरात येताच इंदिरानगरसह संपुर्ण पोलीस आयुक्तालयावर शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक शहर पोलीस दलाने एका योध्दा गमावल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे.
दरम्यान, शहर पोलीस दलातील एकूण 8 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी पाच कोरोनामुक्त झाले तर दोघे अद्याप रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. ते परिमंडळ-१मधील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. तर, परिमंडळ-२मधील पोलीस ठाण्यातील कर्मचाारी आता कोरोनामुक्त झाले आहेत. मृत पोलीस हवालदाराच्या वारसदारांना शासन नियमानुसार सर्वोतोपरी अर्थसहाय्य केले जाणार आहे. कोरोना संक्रमण काळात कर्तव्य बजावताना पोलीसाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.