नाशिक - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नाशिकहुन आज पुन्हा किसान सभेच्या माध्यमातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे आणि प्रस्तावित वीजबिल विधायक रद्द करावे अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
जाहीर सभेतून करणार संबोधित
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून आज किसान सभेच्या माध्यमातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे वाहनाने रवाना झाले. यात जिल्ह्यातील पिंपळगाव, चांदवड येथील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. हे शेतकरी उद्या 3 जानेवारी रोजी नागपूर येथे पोहोचणार असून तेथे अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव अतुल कुमार अंजान हे जाहीर सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीदेखील होणार सहभागी
आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीदेखील सहभागी होणार असून त्यादेखील दिल्ली येथे जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले. केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि प्रस्तावित वीजबिल विधायक रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मोर्चात किसन सभेचे प्रकाश रेड्डी, भास्करराव शिंदे, देविदास भोपळे, विजय दराडे, सुखदेव केदारे, दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोडके, मधुकर मुठाळ आदी सहभागी होणार आहेत.