नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष पिकांवर आधी अवकाळी पावसाचे संकट आले. यातून वाचलेल्या पिकांना धुके व थंडीपासून वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली. तर, आता द्राक्ष पीक तयार झाले असताना त्यावर वटवाघळांचे संकट ओढावले आहे. या वटवाघळांपासून संरक्षणाकरिता आता शेतकरी आपल्या शेतातील द्राक्ष बागांवर बडनेट(जाळी) टाकून द्राक्ष वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत.
दिंडोरी तालुक्याला द्राक्ष पंढरी म्हणून संबोधले जाते. मात्र, यावर्षी आगस्ट व सप्टेंबर महिण्यात जोरदार पाऊस असल्यामुळे द्राक्ष पिकांना वाचवताना शेतकऱ्यांना अतोनात मेहनत करावी लागली. धुके व थंडीमुळे द्राक्षे फुटणार नाहीत यासाठी रात्री शेकोटी करून द्राक्ष पीक वाचवली. परंतू, आता १२० दिवासांचे काळी सोनाका पीक विक्रीसाठी तयार झाले असतांना त्या पिकावर वटवाघळांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकरी बडनेट (जाळी) संपूर्ण बागावर टाकून आपली द्राक्ष वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, ही जाळी रात्री चमकत असल्यामुळे कुठलेही पक्षी रात्री द्राक्षाचे नुकसान करत नसल्याचे द्राक्ष उत्पादक वसंत काळोगे यांनी सांगितले. या द्राक्ष पिकांची ३ सप्टेंबर रोजी गोळाबार छाटणी करण्यात आली. तर, पाऊस असल्यामुळे याला एकरी ३ लाखांपर्यंतचा खर्च आल्याचे काळोगे म्हणाले.