राज्य उत्पादन शुल्क विभागाची ४ जिल्ह्यात छापेमारी, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त - विभाग
2019-03-30 07:11:25
आचारसंहितेचे पालन काटोकोर पद्धतीने केले जावे, यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यात छापे टाकण्यात आले.
नाशिक- आचारसंहितेचे पालन काटोकोर पद्धतीने केले जावे, यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यात छापे टाकण्यात आले. यात २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत आणि उप अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
नाशिक विभागात एकूण चार जिल्हे आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात रेग्युलर २ फ्लाईंग स्कॉड, २ विशेष भरारी पथके, २ अतिरिक्त सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात एक अतिरिक्त सीमा तपासणी नाका चोरवड येथे उभारण्यात आला आहे. या अंतर्गत नाशिकमध्ये एकूण १० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून ५०० लिटर हातभट्टी दारू, १ हजार लिटर रसायन देशी दारू हस्तगत करण्यात आली. या व्यतिरिक्त भरारी पथकाने इगतपुरी तालुक्यातील चवाटेवाडी या ठिकाणी हातभट्टी दारु युनिट उद्धस्त केले आहे. तक्रार नोंदवण्यासाठी विभागाने लँडलाईन क्रमांक दिले आहेत. नागरिकांनी नाशिक कार्यालयाच्या २५३२५७८६३५ आणि २५३२३१९७४४ या क्रमांकावर फोन करावा असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.