नाशिक:मिळालेली माहीती अशी की, पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा येथे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी कळमुस्ते येथे आणण्यात आला. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे जबाबदार असल्याचे ठरविले गेले. हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र-तंत्र, जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा अंधश्रद्धेतून आरोप काही नातेवाईकांनी केला. यानंतर त्यांनी भीमा बारकू तेलवडे आणि त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना बेदम मारहाण केली. या घटनेत भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली तर भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर मुकामार लागला आहे.
गुन्हा दाखल करण्याची विनंती: कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊतमाळे यांनी जखमी अवस्थेत या वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस ठाण्यात आणले. अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणा विरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली.
तक्रारीची दखल घेतली नाही:तेलवडे ह्या वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्याच घराण्यातील काही जणांच्या विरोधात दाखल झाला. या प्रकरणात हरसुल पोलिसांनी जादूटोणाविरोधी कलमे लावली नसल्याचे आढळले. सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दाम्पत्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून, ग्रामीण पोलीस अधीक्षकांसमोर आणले. जबर मारहाण झालेले वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील सात आठ वर्षांपासून गावातील काही लोक व भावकीतील काही लोक हे आई-वडिलांना भूताळा-भुताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी नाशिक पोलीस अधीक्षक, नाशिक( ग्रामीण) व हरसुल पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून रवी तेलवडे यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली. त्वरित कारवाई करण्यात आली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दाम्पत्याचा मुलगा रवी तेलवडे यांनी व्यक्त केली.
जादूटोणाविरुद्ध कलम लावावे:कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे असे विनंतीपत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांना देण्यात आलेले आहे. या विनंती पत्रावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा:HSC Exam 2023 : बेस्ट ऑफ लक! मंगळवारपासून बारावीची परीक्षा, 'ही' आहेत ठळक वैशिष्ट्य, वाचा सविस्तर