नाशिक - केसाचा भांग मध्यभागी पाडल्याच्या शुल्लक कारणावरून येथे एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीनीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत सदर शिक्षकाने मद्यपान केल्याचा आरोपही या पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. पालक चौकशीसाठी शाळेत आले असता, या शिक्षकाने पलायन केले.
दारूड्या शिक्षकाची मुलीस बेदम मारहाण येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयातील एका मद्यधुंद शिक्षकाने मुलीला बेदम मारहाण केली. खूशबू असे मारहाण करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. शुक्रवारी स्पर्धा परीक्षेचा पेपर असतानाही ही मुलगी शिक्षकाच्या भीतीपोटी शाळेत गेली नाही. घरी पालकांना हे कळले. त्यानंतर आज सकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. यावेळी गर्दी पाहून हा मद्यधुंद शिक्षक फरार झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यालयातील ए. पी. ठाकरे हा शिक्षक दारू पिऊन शाळेत येत होता. अनेकदा तो मुलींना वर्गात शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करीत होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला दुसऱ्या वर्गाची शिकवण्यासाठी पाठवले. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात तो पुन्हा दहावीच्या व नववीच्या वर्गावर इंग्रजी व मराठी विषय शिकवू लागला. रोज सकाळी हा शिक्षक दारू पिऊन वर्गावर येत होता. आणि अभ्यास केला नाही, भांग पाडला नाही, अशा वेगवेगळ्या कारणांवरून मुलींच्या केसांना पकडून बेदम मारहाण करीत होता.
शिक्षकाच्या विरोधात पालक नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्याची तक्रार देण्यासाठी आले. पोलीस निरीक्षक सुधीर डोंगरे यांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली. सामाजिक कार्यकर्ते शाम परदेशी यांच्यासह किरण पवार, पूजा जाधव, सरिता पगारे, सुरेश कुमार विश्वकर्मा आदी पालक व सामाजिक कार्यकर्ते यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्यात उपस्थित होते.