नाशिक Drug Search Operation Nashik: मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रग्स माफिया ललित पाटीलचा (lalit patil drug case) वाहनचालक सचिन वाघ याने देवळा ठेंगोड्यातील गिरणा नदीपात्रात ड्रग्जसाठा फेकल्याचे सांगितले. यानंतर तो शोधासाठी मुंबई पोलिसांनी नदीच्या पाणी पातळीमुळे शोधमोहीम थांबेल म्हणून स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्यांदा मोहीम राबविली; मात्र पाणी पातळी (water wastage to find drug stash) कमी करण्यासाठी ठेंगोडा साठवण बंदराजवळील लोहनेर व देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी संरक्षित सुमारे 200 क्यूसेस पाणीसाठा रविवारी पहाटे सहा पासून दुपारी तीन पर्यंत सोडण्यात आला. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पाणी थांबवण्यात आले; परंतु तोपर्यंत 20 कोटी लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. गिरणा नदी पात्रात आता केवळ मृत साठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे पुढील तीन महिन्यांचा पाणीप्रश्न निर्माण झालाय. दुसऱ्या मोहिमेतही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्यानं त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.
कारवाई करावी:पाणी सोडण्यास विरोध केला असता पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे सांगत आम्हाला शांत केलं. मात्र, कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पाणी सोडण्याबाबत नेमके कुणाचे व काय आदेश होते याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. हे नदीचे पाणी भविष्यात शेतीसाठी वापरता आले असते. पण, ते पोलिसांकडून वाया घालवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.