नाशिक- संपुर्ण राज्यालाच अवैध उत्खननाने पोखरले आहे. या प्रकाराला रोखणे प्रशासनासाठी जिकरीचे आणि अधिकाऱ्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनास प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून यावर उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
नाशिकमध्ये ड्रोनद्वारे अवैध उत्खननावर करडी नजर; जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहीती - Collector Suraj Mandhare Nashik
नाशिक जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनास प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहे. आशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
अवैध उत्खननावर तसेच अवैध वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य शासनाने शौर्य इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये हा पायलेट प्रोजेक्ट आकारास येणार आहे.
या ड्रोन प्रणालीची सुरुवात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे दगड- खदानीचे छायाचित्रीकरण करून त्या खदानीची सीमा पडताळणी व भू-संदर्भ निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच खदान्याच्या कामकाजाचे विश्लेषण करण्यासाठी नियमित अंतराने हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या महसुलात देखील वाढ होणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.