नाशिक- जिल्ह्यातील मालेगाव शहराच्या आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून पोलीस निरिक्षक आणि एका राजकीय नेत्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या घटनेमुळे राजकीय समर्थकांसह हजारो नागरिकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्याने तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत चर्चा केल्यानंतर तणाव निवळला.
मालेगावात मुलांच्या भांडणातून राजकीय नेत्याचा पोलिसांसोबत वाद, पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावामुळे तणाव
एवढा मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती उद्भवली होती. मात्र, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले. समन्वयाने हे प्रकरण मिटवण्यात आले.
शहरातील नेहरू चौकात अल्पवयीन मुलांध्ये भांडण होत असल्याची बातमी पोलिसांना कळताच त्यांनी ताबडतोब जाऊन मुलांना पोलीस ठाण्यात आणले. यात संबंधीत राजकीय व्यक्तीचा मुलगाही होता. यावरून ती राजकीय व्यक्ती आणि पोलीस निरिक्षक दिलीप पारेकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाची बातमी शहरात पसरताच राजकीय व्यक्तीच्या समर्थनार्थ समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन, गर्दी कमी करून मुलांना समज देण्यात आली.