नाशिक - छंदोमयी ग्रुप कडून नाशिकच्या गंगापूर रोड वरील विश्वास हॉलमध्ये छंदोत्सव प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रभरातून छंद जोपासणारे छंदवेडे कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. हे अनोखे प्रदर्शन बघण्यासाठी नाशिककरांची गर्दी होत आहे.
प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळा छंद असतो. काहींना क्रिकेट मॅच बघण्याचा, चांगले पदार्थ बनवण्याचा, गाण्याचा, वाचनाचा काहीनां नाणी जमवण्याचा छंद असतो, तर काहींना वेगवेगळ्या वस्तू एकत्रित करण्याचा छंद असतो. अश्याच छंद जोपासणाऱ्या व्यक्तींना प्रसाद देशपांडे यांनी छंदोमयी ग्रूपच्या माध्यमातून एकत्र आणले आहे. या छंदांचे प्रदर्शन त्यांनी नाशिकच्या गंगापूर रोड वरील विश्वास हॉल मध्ये भरवले आहे.
नाशकात भरले छंद वेड्यांचे "छंदोत्सव प्रदर्शन या छंद प्रदर्शनात प्रसाद देशपांडे यांचे जीवन चरित्र स्वाक्षरी, दिलीप वैती (ठाणे )यांनी गणेशाची विविध रूपे व जगातील गणेशाची विविध पेंटिंग, विजय चुभळे ( नाशिक) यांनी पुरातन शिवकालीन नाणी, कार मॉडेल्स, अनिकेत पावसकर (सिंधुदुर्ग) मान्यवरांची शुभेच्छापत्र, अच्युत गुजराथी, नलिनी गुजराथी शंख, शिंपले, सागर पावस्कर (सिंधुदुर्ग) दुर्मिळ नाणी ,पंडित (नाशिक) यांनी धातू शिल्प, पंकज दुसाने (अमळनेर) दुर्मिळ पुरातन वस्तू, अनंत खैरनार (नाशिक) यांनी कापूस शिल्प, अशोक जाधव (सांगली) यांनी जाळीदार पिंपळ पानावर पेंटिंग, संजय क्षत्रिय (सिन्नर) यांनी खडूवर सुपारीवरील सूक्ष्म गणेश, आशुतोष पाटील (औरंगाबाद )यांनी शिवराई सर्वात नाण्यावर संशोधन, वामनाचार्य( नाशिक) यांनी रेल्वे बस म्युझियमचे तिकीट्स मनोज लोणकर (डोंबिवली) यांनी कुलूपाचा संग्रह केल्याचे पाहायला मिळाले.
त्याच प्रमाणे आनंद काकड (नाशिक) यांनी स्टॅम्प टपाल तिकीट, महेंद्र कुलकर्णी यांनी विविध आकार प्रकारच्या बाटल्या, आनंद धामणे - यांनी जुन्या पुरातन वस्तू, प्रशांत वाघ यांनी लॉकेट/ पदक (घुबडाची पदक) पद्धत, सतीश चाफेकर (डोंबिवली )यांनी क्रिकेट साहित्यावर क्रिकेट वीरांच्या स्वाक्षऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छंद प्रेमींनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.