नाशिक- माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठून यावे लागले. त्यामुळे मला माफ करा. मी सकाळी इतक्या लवकर येईल की नाही, अशी चर्चा होती. मात्र, एकजण म्हणाला की येतील, हे सकाळीच उठून शपथ घेत असतात, असे म्हणाताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
सकाळी उठण्यावरून अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले... लहान-लहान मुले-मुली चांगल्या पद्धतीने शिकतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त दिसते. मुलांचे मात्र लक्ष दुसरीकडे असते. त्यांनीही इकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. तसेच सध्या बेरोजगारी वाढलेली आहे. आम्ही बऱ्याचशा सरकारी नोकरीच्या जागा भरण्याचा विचार करत आहोत. ८ हजार पोलिसांची भरती करणार आहोत. त्यानंतर कृषी, जलसंपदा, आरोग्य अशा अनेका खात्यांमध्ये आमचे सरकार भरती करणार आहे. काहींना तरी याद्वारे काम मिळेल. कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य सरकार हा उपक्रम राबवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अनेक प्रकारच्या प्रलोभनांना मुले-मुली बळी पडतात. कोणी धुम्रपानासारख्या व्यसनांच्या आहारी जातात. परिणामी आरोग्याची हानी होते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका. आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही तंदुरुस्त राहाल. मन आणि शरीर निरोगी कसे राहील, याबाबत काळजी घ्या. आता कोरोना व्हायरस आला. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या, असेही ते विद्यार्थ्यांना म्हणाले.
चुकीच्या बातम्या समाजात पसरवण्याचे काम काहीजण करतात. मध्यंतरी बातमी आली होती की, माझा आणि अशोक चव्हाणांचा वाद झाला. मात्र, आमच्यामध्ये कसलाही वाद झाला नाही. त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांचा खुर्चीत बसण्यावरून वाद झाला. मात्र, मी स्वतः त्याठिकाणी उपस्थित होतो. असे काही झालेले नाही. हे सरकार टिकवण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे इतर कोणी काहीही करू शकत नाही. त्यामुळे अशा बातम्या आल्या की कोणीतरी जाणीवपूर्वक चावटपणा करतोय असे समाजायचे, असे अजित पवार म्हणाले.