नाशिक- पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. नाशिकच्या सय्यद पिंपरी शिवारात असलेल्या बंद दगड खाणीच्या पाण्यात ही घटना घडली. तन्वीर सलीम पठाण असे या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक ग्रामीण दलात होमगार्ड म्हणून कार्यरत होता.
नाशिकच्या सय्यद पिंपरी शिवारात असलेल्या बंद दगड खाणीच्या पाण्यामध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओझर गावात राहणारा तन्वीर सलीम पठाण हा तरुण पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. तन्वीर पठाण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात होमगार्ड म्हणून कार्यरत होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तन्वीरचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे शोधकार्यास अडथळा येत असल्याने थांबवण्यात आले. मंगळवारी सकाळपासूनच मृतदेहाचा शोध घेत असताना सकाळी दहा वाजताच्या सुमारास तन्वीरचा मृतदेह सापडला.