नाशिक Dasara २०२३: मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व यंदा अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे कांदा, गहू, मका, हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातून शेतकरी कसाबसा उभा राहून झेंडूच्या फुलांची शेती (Marigold Flower) केली. मात्र पाऊसच न पडल्याने झाडांची वाढ खुंटली, परिणामी फुलांचे उत्पादन घटले. यामुळे यंदा भाव असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे.
झेंडूच्या फुलांना चांगला भाव: कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा एक ना अनेक संकटात सापडलेल्या बळीराजाला मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदाही अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे कांदा, मका, हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांमधून मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामुळे हतबल झालेल्या कसमादे पट्टयातील शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांकडुन अपेक्षा होती. यामुळे काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी झेंडूचे पीक घेतले. मात्र पाणीच नसल्यानं झेंडूच्या झाडांची वाढ खुंटली व अवघ्या दीड फुटांची वाढ झाल्याने उत्पादन देखील घटले. यामुळे यंदा दसरा दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव असूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे.
दसऱ्याला झेंडूची फुले करणार शंभरी पार : सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली. लागवडीनंतर साधारणत: ५० ते ५५ दिवसांनी फुले काढण्यास सुरूवात होते. विजयादशमीचा सण डोळ्यांसमोर ठेवून ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या सुरूवातीला फुलांची लागवड करण्यात आली. जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली. टोमॅटोचे दर एकदम घसरल्याने शेतकऱ्यांनी पीक काढून टाकत त्या ठिकाणी झेंडूची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड वाढली. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते. सध्या लागवड होत असलेली फुले दिवाळीत बाजारात येऊ शकतील. जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ३५० ते ४०० एकरवर झेंडूची लागवड होते. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लागवड २०० ते २५० एकरवर आली आहे. विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील. मात्र मालच नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच असणार आहे.