नाशिक- शहरात एकीकडे करोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधिताना मोबाईलवर व्हिडिओ कॉलची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये टीव्ही संच देखील बसवण्यात येणार असल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाबाधितांना आपल्या कुटुंबीयांसोबत संपर्क करुन उपचाराची माहिती त्यांना मिळावी, यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
'स्मार्ट' जिल्हा रुग्णालय; उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना कुटूंबीयांच्या संपर्कासाठी मिळणार मोबाईल - जिल्हा रुग्णालय कोरोनाबाधितांना देणार मोबाईल
जिल्हा शासकीय रुग्णालयाने उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधिताना मोबाईलवर व्हिडिओ कॉलची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये टीव्ही संच देखील बसवण्यात येणार असल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
अत्यंत घाबरलेल्या, निराशाजनक अशा वातावरणात कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील उपचार घेत असलेले रुग्ण परिवारापासून एकटे पडल्याची भावना व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांसाठी मोबाईल उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या माध्यमातून रुग्ण आपल्या कुटुंबीयांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलू शकणार आहेत. याशिवाय प्रत्येक कोरोना वॉर्डमध्ये टीव्ही संच बसविण्यात येणार असून या माध्यमातून रुग्णांना समुपदेशन आणि त्यासोबत त्यांचे मनोरंजन देखील केले जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा साडेचार हजाराच्या वर पोहोचला आहे. तर शहरात देखील रुग्णाचा आकडा अडीच हजारांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची मानसिकता टिकवून ठेवणे देखील उपचाराचा महत्वाचा भाग असल्याने नाशिक जिल्हा प्रशासनाने राबवलेला हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या काळात या उपक्रमाचे अनुकरण राज्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे.