मनमाड -पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षांसह पालिका प्रशासनाला धारेवर धरत विरोध केला. मार्चनंतर तब्बल नऊ महिन्यानंतर आज मनमाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सुरवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी यांनी कार्यालयाबाहेर जनतेला भेटण्यासाठीची वेळ असा फलक लावून मनमाडच्या जनतेचा अपमान केला आहे. आधी तो बोर्ड काढावा, त्यानंतर सभा सुरू करावी, अशी मागणी लावून धरली. यानंतर सुरू असलेले काम बंद का केले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पगारे यांनी विचारत व्हेलमध्ये जाऊन खाली बसून जोपर्यंत लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत सभा पुढे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.
'त्याऐवजी बॅरिकेडिंग झाले असते'
त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कैलास पाटील व काँग्रेसचे गटनेते रवींद्र घोडेस्वार यांच्यासह सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन व्हेलमध्ये जमिनीवर बसत धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर कोव्हिडकाळात पालिकेच्या वतीने कंटेनमेंट झोन बॅरिकेडिंगसह थर्मामिटर व ऑक्सीमीटर यांच्यासह इतर गोष्टींच्या नावाखाली जवळपास 9 लाखाचे बिल काढले. एवढ्या पैशात संपूर्ण मनमाड शहराला बॅरिकेडिंग केले असते, असा आरोप करत जोरदार निषेध केला. तसेच मुख्याधिकारी हे जनतेचे काम करत नसून केवळ पाट्या टाकण्याचे काम करत आहेत. यासह विविध मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांत खंडांजगी झाली.