नाशिक- मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार निवडीवरून काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी नवीन आमदारांना अधिवेशनामध्ये येण्यासाठी संधी द्यायला हवी. मात्र, ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडी संदर्भात एक निर्णय घेत आहेत आणि नवीन आमदारांच्या निवडी संदर्भात एक निर्णय, त्यांची अशा प्रकारे वेगवेगळी भूमिका का आहे? याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे मत महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपाल वेगवेगळे निर्णय का घेतात? बाळासाहेब थोरातांचा सवाल
राज्यपाल हे नवीन आमदारांच्या हक्कांवरती गदा आणत आहेत. नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी घटनेप्रमाणे नवीन आमदारांची नावे घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु तेच राज्यपाल वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचे आता राज्यासमोर येत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री थोरात यांनी दिली.
राज्यपाल हे नवीन आमदारांच्या हक्का वरती गदा आणत आहेत-
आपल्या खासगी कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे महसूल मंत्री यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी थोरात म्हणाले, की राज्यपाल हे नवीन आमदारांच्या हक्कांवरती गदा आणत आहेत. नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी घटनेप्रमाणे नवीन आमदारांची नावे घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु तेच राज्यपाल वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचे आता राज्यासमोर येत आहे.
राज्यपालांच्या दुहेरी भूमिकेबाबत आता संशय-
विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यानंतर राज्यपालांनी तातडीने या ठिकाणी अध्यक्ष नियुक्त करावा, असे सरकारला सूचित केले आहे. परंतु त्याच विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सभागृहासाठी आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपाल मान्य करत नाहीत, अशी भूमिका का घेतात? असा प्रश्न थोरातांनी उपस्थित केला. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की राज्यपालांच्या या दुहेरी भूमिकेबाबत आता संशय येत आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे, तो सहयोगी मित्र पक्षांबरोबर चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांनी खबरदारी न घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की आज नागरिकांनी खबरदारी न घेतल्यामुळे राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि तो रोखण्यासाठी आता सक्तीने पावले उचलावी लागणार आहेत. जर नागरिक खबरदारी घेणार नसतील तर नाईलाजाने सरकारलाही कडक भूमिका घ्यावी लागेल, असाही सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला. प्रशासनाने नागरिकांना वारंवार संधी दिली आहे. परंतु त्या संधीकडे दुर्लक्ष करत नागरिक महामारीचा प्रादुर्भाव वाढेल याकडे नागरिक पावले टाकत आहेत. त्यामुळे याबाबत आता सरकारला कडकभूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला