नाशिक : शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या अशा घटनांमुळे नाशिककर भयभीत झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटवाडी येथे भरदिवसा घडली.
दोन गटांचा एकमेकांवर हल्ला : दोन गटांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे. स्कॉर्पिओ व फॉर्च्युनर कारमधून आलेल्या युवकांमध्ये आपापसात तुंबळ हाणामारी झाली. यात काहींकडे तलवारी व कोयत्यासारखी धारदार हत्यारे होती. त्यातील काहींनी हत्यारे उगारत एका युवकावर हल्ला केला. सोबतच्या युवकांनी तलवारीने जखमी झालेल्या युवकास तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मोबाईलमध्ये घटना चित्रित :या घटनेनंतर अंबड पोलिसांशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला. यात तलवार, कोयते तसेच हाणामारीचे गंभीर चित्र दिसून आले. त्यामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय? असा प्रश्न नाशिककरांना पडू लागला आहे. टवाळखोर युवकांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होते आहे. काही दिवसांपूर्वीच सिडको भागामध्ये वाहनांच्या काचा फोडणे, चोरी, लुटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.